शेरी गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक सुधीर पद्मन्नावर यांनी गरजूंच्या उपयोगी पडावे यासाठी आपल्याकडील बिन वापराचे एक ऑक्सिजन सिलेंडर आणि दोन फ्लोमीटर्स आज हेल्प फाॅर नीडी या सेवाभावी संघटनेला देणगीदाखल दिले.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फाॅर नीडी शाखेतर्फे नागरिकांना घरातील वापरात नसलेली वैद्यकीय उपकरणे गरजूंच्या मदतीसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत निपाणी येथील आपली कन्या ज्वालाना व पवन चामराज हर्दि यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेरी गल्लीतील सुधीर पद्मन्नावर यांनी वरीलप्रमाणे आदर्शवत उपक्रम राबविला.
पद्मन्नावर यांनी आज बुधवारी सकाळी हेल्प फाॅर नीडी संघटनेचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेऊन त्यांच्याकडे आपल्याकडील बिन वापरात असलेले ऑक्सीजन सिलेंडर आणि दोन ऑक्सीफ्लोमीटर्स सुपूर्द केले.
सदर देणगीबद्दल सुरेंद्र अनगोळकर यांनी आभार प्रकट केले आहेत. त्याचप्रमाणे मागील कोरोना काळात खरेदी केलेली विविध आवश्यक वैद्यकीय उपकरणे जर कोणाच्या घरी बिन वापराची धूळखात पडून असतील तर ती इतरांच्या कामी येऊ शकतात हे लक्षात घेतले पाहिजे.
या उपकरणांची मदत तातडीने गरज असणाऱ्या असहाय्य गरीब रुग्णांना होऊ शकते. तरी संबंधित नागरिकांनी स्वच्छेने ती उपकरणे आमच्याकडे सोपवून सामाजिक कार्याला हातभार लावावा आणि गरजु रुग्णांचा दुवा मिळवावा, असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर यांनी केले आहे.