Monday, November 18, 2024

/

यांच्याकडूनच डॉ. आंबेडकर पुतळ्याची विटंबना

 belgaum

मांजरी (ता. चिक्कोडी) येथे दोन दिवसापूर्वी घडलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणाचा छडा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात लावला असून दलित युवकांनीच हा निंद्य प्रकार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे.

दलित-सवर्ण वाद पेटविण्यासाठी एका टोळक्याने विटंबनेचे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. चिक्कोडी पोलिसांची तत्परता आणि स्थानिक नागरिकांनी केलेली मदत यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून एकूण पाच जणांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पिंटू लंबूगोळ, योगेश भीमण्णावर, प्रताप कसाई व प्रशांत कसाई (सर्व रा. मांजरी) अशी अटक करण्यात आलेल्या 4 जणांची नावे आहेत. राजू कुरणे हा अन्य तरुण फरारी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार, निपाणीचे मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक भरत गौडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुतळा विटंबना प्रकरणाचा छडा लावला आहे.

शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करून त्याचे खापर आपल्या विरोधकांवर फोडण्याचा, भांडणाला दलित-सवर्ण स्वरूप देण्याचा आरोपींचा डाव होता. मांजरी येथील अमर सारापुरे, सुनील पुजारी, प्रवीण आदी युवकांसोबत आरोपींचे भांडण झाले होते. भांडणाच्या घटनेनंतर दलित समाजातील नेत्यांनी सबुरीचा सल्ला दिला होता. तथापि आपली बाजू कोणीच घेत नाही म्हणून मंगळवारी मध्यरात्री पाच जणांच्या या टोळक्याने स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना केली. त्याचे पडसाद उमटून आपल्या विरोधकांच्या घरांवर हल्ला होईल हा त्यांचा हेतू होता. मात्र दलित समाजातील प्रमुखांना या गोष्टीची कल्पना असल्याने या टोळक्याच्या पदरी निराशा पडली. अखेर चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलीगार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने पुतळा अवमान प्रकरणाचा छडा लावून या घटनेमागील सत्य उजेडात आणले.

दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना झाल्याची माहिती गावात पसरताच तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र स्थानिक दलित नेते आणि वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण संयमाने हाताळून तपासासाठी पोलिस दलाला सहकार्य केले. या पुतळा विटंबना प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी दलित नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेचे पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.