Friday, December 27, 2024

/

मोहनगा यात्रेला गेलेल्या युवकाचा खून

 belgaum

गावातील आपल्या दोन मित्रांसह मोहनगा (दड्डी) येथील भावेश्वरी देवी यात्रेला गेलेल्या बाळेकुंद्री खुर्दच्या एका युवकाचा खून झाला आहे. दड्डी क्रॉसजवळ काल बुधवारी दुपारी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला.

खून झालेल्या युवकाचे नांव सदानंद इरय्या कुलकर्णी (वय 31, रा. बाळेकुंद्री खुर्द) असे आहे. त्याची आई महादेवी इरय्या कुलकर्णी यांनी यमकनमर्डी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. खुनाचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. सदानंदचा मृतदेह काल बुधवारी दुपारी दड्डी क्रॉसजवळ झाडीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन ओळख पटविली.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळेकुंद्री खुर्द येथील सदानंद हा गावातील इतर दोघा मित्रांसोबत गेल्या 18 फेब्रुवारी रोजी दड्डी मोहनगा येथील भावकेश्वर यात्रेला गेला होता. मात्र तेथून तो घरी परतलाच नाही. त्यानंतर काल दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृतदेह दड्डी क्रॉस येथील झाडीमध्ये सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

सदानंदच्या आईने सुरुवातीला आपला मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद यमकनमर्डी पोलिसात दिली होती. सदानंद बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्या घरच्यांनी फोन करून चौकशी केली असता त्याने जेवण करून परतणार असल्याचे कळवले होते. परंतु 18 फेब्रुवारीला त्याचा फोन स्वीच ऑफ लागला होता.

घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, उपनिरीक्षक डि. व्ही. न्यामगौडा, एस. एम. चिक्काण्णा आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

ज्या दोघांसमवेत सदानंद यात्रेला गेला होता त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून ते सापडल्यानंतर सदानंदाचा खून कशासाठी झाला याचा उलगडा होणार आहे. संबंधित दोघांवर भादवि 302 कलमान्वये खून व 201 कलमान्वये पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमकनमर्डी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.