सुधारणेच्या नांवाखाली मराठीभाषीक खेड्यांमध्ये सुरू असलेले भूसंपादनाचे प्रकार तात्काळ थांबवावे अन्यथा महिन्याभरात भव्य मोर्चाद्वारे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिला आहे.
मराठा मंदिर येथे आज दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दीपक दळवी बेळगाव लाइव्हशी बोलत होते. अलीकडच्या काळात सरकारकडून भूसंपादनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. मात्र सर्व जमिनीचे भूसंपादन फक्त मराठी भाषिक खेड्यांमध्येच होत आहे.
सुधारणेचे नांव पुढे करून बेधडकपणे जमिनी घेतल्या जात असल्यामुळे एक दिवस मराठी भाषिक उद्ध्वस्त होण्याची वेळ येणार आहे. तेंव्हा भूसंपादनाचे हे प्रकार तात्काळ थांबविले जावेत या मागणीसाठी भव्य मोर्चाद्वारे आंदोलन छेडण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तेंव्हा जर मराठी भाषिक खेडेगावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ थांबविले गेले नाही तर येत्या महिन्याभरात भव्य मोर्चा काढला जाईल, अशी माहिती दळवी यांनी दिली.
‘ट्विटर वर मध्यवर्ती नावाचा वापर नको’
सोशल मीडियावर कांहीजण मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नांवाचा वापर करत आहेत का? या संदर्भात बोलताना ते म्हणाले की चार मराठी भाषिक माणसं एकत्र आली किती समिती होऊ शकते. तथापी मराठी भाषिकांची व्यथा मांडणारे एखादे व्यासपीठ ज्यांना तयार करायचे आहे असे अनेक तरुण त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत.
आपलं कुणीतरी ऐकावं अशी त्यांची भावना असते. तथापि नुकतेच काहींनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी घातक किंवा आमच्या विचारा पलिकडचे विचार सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे समजते.
मात्र जर कोणी मध्यवर्तीच्या धोरणाशी किंवा समितीच्या धोरणा विरोधात जर कांही गोष्टी करत असतील तर माझी विनंती आहे की जे कोणी फेसबुक, ट्विटर आदी माध्यमांद्वारे हे प्रकार करत आहेत, त्यांनी आपल्या वैयक्तिक नांवावर मराठी भाषिक म्हणून आपले मत किंवा आपल्या भावना प्रकट कराव्यात. त्यासाठी कृपया म. ए. समिती किंवा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नांवाचा कृपया वापर करू नये, असे आवाहनही दीपक दळवी यांनी केले.