सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाचा दावा लवकरात लवकर निकालात निघण्यास मदत व्हावी यासाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची तसेच विशेष अधिकारी म्हणून दिनेश ओऊळकर यांची नियुक्ती केली जावी अशी विनंती वजा मागणी महाराष्ट्रातील नेतृत्वाकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिज खानापूर रोड येथील मराठा मंदिर कार्यालयांमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज दुपारी झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी हे होते. बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमाप्रश्नाचा दावा, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे तज्ञ समितीच्या अध्यक्ष पदाची रिक्त झालेली जागा, तसेच दयनीय अवस्थेतील मराठी शाळांसह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना अध्यक्ष दीपक दळवी यांनी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे तर विशेष अधिकारी म्हणून दिनेश ओऊळकर यांचे नांव महाराष्ट्रातील नेतृत्वाला सुचविल्याचे सांगितले. जयंत पाटील सत्तेत राहून वेळोवेळी आम्हाला मदत करत आले आहेत. शिवाय ते एन. डी. पाटील यांच्या तालुक्यातील आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना सहजासहजी भेटणे सोयीचे होणार आहे. बाहेरून अनेक जण आपल्याला मदत करतील. मात्र सत्तेत असताना सीमाप्रश्नासाठी सत्तेचा वापर करणाऱ्या नेत्याची आम्हाला गरज आहे. जयंत पाटील यांनीही थोडे दिवस थांबा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन असे स्वतः सांगितले आहे. तसेच बदललेल्या लोकांना परत तिथे आणा असा सल्लाही दिला आहे. त्यानुसार सीमाप्रश्नी विशेष अधिकारी म्हणून पुन्हा दिनेश ओऊळकर यांची नेमणूक करण्याची मागणी आम्ही केली आहे. ओऊळकर हे जरी निवृत्त झाले असले तरी सीमाप्रश्नाच्या खटल्यात ते सुरुवातीपासून आहेत. हा खटला उभा करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. कांही चुका झाल्यास अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची त्यांची क्षमता आहे. याची माहितीही आम्ही महाराष्ट्रातील नेतृत्वाला दिली आहे, असे दळवी यांनी स्पष्ट केले.
खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी गेल्या 2004 मध्ये सीमाप्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जावी? अशी विचारणा झाली असता. त्यावेळी महाराष्ट्राचे नेते विलासराव देशमुख यांनी एन. डी. पाटील हे अभ्यासू असून त्यांना अध्यक्ष करावे असे सुचविले होते. त्याला तत्कालीन समिती नेत्यांनी एकमताने संमती दिली होती.
त्यानुसार आत्ता देखील तज्ञ समितीच्या अध्यक्षपदाच्या नावासंदर्भात ठराव संमत करून तो महाराष्ट्रातील नेतृत्वाकडे पाठविला पाहिजे, असे सूचित केले. बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, चिटणीस रणजीत चव्हाण -पाटील, विकास कलघटगी आदींसह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.