बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा निषेध करणाऱ्या मराठी युवकांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यांसंदर्भात सर्वतोपरी सहकार्य केले जाईल आणि सीमा प्रश्न येत्या वर्षभराच्या आसपास निकालात निघेल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना ही माहिती दिली. दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावचे प्रख्यात उद्योगपती अरविंद गोगटे यांचे नुकतेच निधन झाले. गोगटे यांचे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यातल्या त्यात त्यांचे महाराष्ट्राचे विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी त्यांचे घरगुती संबंध होते. त्यामुळे मंत्री जयंत पाटील यांनी आज बेळगावातील गोगटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या पद्धतीने बेळगाव भेटीवर आलेल्या जल संपदा मंत्री जयंत पाटील यांची आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली सर्किट हाऊस येथे भेट घेतली.
सर्किट हाऊस येथील भेटीप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत आम्ही अलीकडे वर्ष-दीड वर्षातील आरटी -आरटीपीसीआर बंधने आणि ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या त्याबद्दल सखोल चर्चा केली. कोर्टातील न्यायाधीशांसंदर्भात आमच्यात एक संभ्रम निर्माण झाला होता. त्याबाबत आम्ही अत्यंत खेळीमेळीत चर्चा केली. आमची समस्या -संभ्रम जाणून घेऊन पाटील यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या ऍटर्नी जनरल यांना आमच्या समक्ष फोन लावून कांही सूचना केल्या. आता उद्या बुधवारी मुंबई येथे ते त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत.
या पद्धतीने न्यायालयीन कामकाज वेगाने पूर्ण व्हावे या दृष्टीने आम्ही त्यांना माहिती दिली. त्यानुसार त्यांनी आमच्या समोरच महाराष्ट्रातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून आम्हाला अपेक्षित अशा सूचना केल्या. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसात आम्हाला जो बदल हवा आहे, ज्या नेमणुका हव्या आहेत त्या मांडल्या जातील आणि या न्यायालयीन प्रश्नाला गती येईल असे मला वाटते असे सांगून येत्या वर्षभराच्या आसपास हा प्रश्न निकालात निघेल असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले असल्याचे दीपक दळवी यांनी स्पष्ट केले.
मंत्री जयंत पाटील यांची भेट घेणाऱ्या समितीच्या शिष्टमंडळात सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, चिटणीस रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आदींचा समावेश होता.