सागरे व दोड्डेबैल (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी यात्रा 16 वर्षानंतर यंदा होत असून या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी यात्राकाळात वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर तालुका आरोग्य अधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज रविवारी खानापूर तालुका आरोग्य अधिकार्यांच्या नावे सादर करण्यात आले. आरोग्य अधिकार्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सागरे व दोड्डेबैल (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी यात्रा 16 वर्षानंतर यंदा होत आहे. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व असून यात्रेसाठी हजारो भाविकांची गर्दी होणार आहे.
कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या या यात्रोत्सवादरम्यान नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन जवळपास आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यासाठी एक रुग्णवाहिका आणि दोन आरोग्य कर्मचारी तैनात केले जावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले की, सागरे व दोड्डेबैल श्री महालक्ष्मी यात्रा उत्सवादरम्यान एक रुग्णवाहिका आणि दोन आरोग्य कर्मचारी आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा उपलब्ध करून दिले जावेत. या संदर्भात माझी फोनवर खानापूर तालुका आरोग्य अधिकारी संजीव दामले यांच्याशी यापूर्वीच चर्चा झाली आहे. त्यांनी आमच्या मागणीनुसार वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. तथापि सर्व कांही नियमानुसार रीतसर व्हावे यासाठी आम्ही आज हे निवेदन सादर करत आहोत, असे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी खानापूर युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, राजू कुंभार आदी उपस्थित होते. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे सागरे व दोड्डेबैल श्री महालक्ष्मी यात्रेसाठी आजपासून बससेवा सुरू झाली. आता वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.