Saturday, January 4, 2025

/

खानापूर जंगलात उद्यापासून सुरू ‘व्याघ्रगणना’

 belgaum

बेळगाव विभागीय वनक्षेत्राच्या खानापूर तालुक्यातील जंगलात वाघांचे वास्तव्य असून भीमगड अभयारण्य, नागरगाळी, कणकुंबी जांबोटी आदी ठिकाणच्या जंगलात लाईन ट्रांझॅक्ट मेथड (रेषा विभाजन) आणि कॅमेरा ट्रॅप पद्धतीने वाघांची गणती करण्यात येणार आहे.

सदर 4 वर्षातून एकदा होणारी व्याघ्रगणना उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे 45 दिवस चालणारी ही व्याघ्र गणती स्थानिक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल कविता इरनट्टी आणि भीमगड सुरक्षित अभयारण्याचे वनक्षेत्रपाल राकेश अर्जुनवाड यांनी दिली आहे.

2015 -16 च्या वन्य प्राणी गणतीमध्ये भिमगड, नागरगाळी अभयारण्यासह जांबोटी आणि कणकुंबी या क्षेत्रात 7 पट्टेरी वाघांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळेस कॅमेरा ट्रॅप आणि पायांच्या ठशांवर ही गणना झाली होती. त्यानंतर आतापर्यंत वाघांची संख्या 12 ते 15 वर पोचली आहे. आता होणारी व्याघ्र गणना रेषा विभाजन आणि कॅमेरा ट्रेकच्या चार पद्धतीतून होणार आहे. याद्वारे वाघांची गणना प्रत्यक्ष आणि परिणामकारकपणे होते. सदर गणतीची प्रक्रिया 45 दिवस चालणार असून तयार करण्यात आलेला अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला पाठविण्यात येणार असून त्यानंतर 6 महिन्यांनी वाघांची संख्या किती आहे हे निश्चित केले जाणार आहे. वाघांच्या संख्या सोबतच जंगलाची स्थिती, जलचर, दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती तसेच त्या परिसरात होणारा मानवी हस्तक्षेप याविषयीच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत.

Tiger
Tiger

लाईन ट्रांझॅक्ट मेथडमध्ये ठरवून दिलेल्या मार्गावर विष्ठा व पायांचे ठसे जमा करणे, तसेच इतर वन्यप्राण्यांच्या नोंदी घेण्यात येतात. त्याचप्रमाणे वाघांचे वास्तव्य असणाऱ्या परिसरातील वनस्पती, झाडे, पाणी आणि येथील नागरिकांचे वास्तव्य यासंदर्भातील माहिती जमा करण्यात येते. यासाठी एक अधिकारी, दोन स्थानिक लोक तसेच चार स्थानिक व कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे.

वाघांच्या पायांचे ठसे सापडल्यानंतर त्याचे ट्रेस पेपरच्या साह्याने ट्रेसिंग केले जाते. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहाय्याने प्लास्टर कास्ट घेऊन तज्ञांकडून विश्लेषण केले जाते. त्यावरून वाघाचे लिंग, वजन, वय ठरविले जाते.

वॉटर होल अकाउंट : या पद्धतीत नदी -नाल्यांच्या ठिकाणी मचान बांधून निरीक्षणाने वाघांची मोजणी करण्यात येते. त्या करिता भीमगड अभयारण्यातील बारापेडी गुहा, पनशिरा नाला, देगाव जवळील म्हादई नदी, कृष्णापुर रस्त्याची कोंड, वज्रा धबधबा तसेच नागरगाळी अभयारण्यातील घनदाट ठिकाणी मचान उभारून मोजणी करण्यात येणार आहे.

कॅमेरा ट्रॅपिंग : वाघांचे वास्तव्य ज्या ठिकाणी आढळून आले आहे अशा ठिकाणी अद्ययावत सेन्सर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी लेझर किरण आणि इन्फ्रारेड कॅमेरे एकमेकासमोर लावले जातात. या दोघांच्यामधून प्राणी गेल्यास लेझर किरण बंद झाल्याने कॅमेरा क्लिक होतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.