हिजाब हा आमचा हक्क असल्यामुळे आम्हाला हिजाब घालून वर्गात प्रवेश दिला जावा, अशी मागणी करत तीन विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याची घटना आज शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये घडली.
राज्यातील सर्व पदवीपूर्व पदवी महाविद्यालयं आजपासून सुरु झाली आहेत. तथापि हिजाब -केशरी स्कार्फ वगैरे परिधान न करता विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करून महाविद्यालयामध्ये यावे न्यायालयाच्या आदेशाचे कुणीही उल्लंघन करू नये असे आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे.
मात्र महाविद्यालय सुरू झालेल्या आजच्या पहिल्या दिवशी शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये तीन विद्यार्थिनी आदेशाचे उल्लंघन करत हिजाब परिधान करून आल्या होता. त्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यावेळी संबंधित विद्यार्थिनींनी हिजाब हा आमचा हक्क आहे. आम्ही हवतर बुरखा घालणार नाही, मात्र हिजाब घालूनच आम्ही वर्गात बसणार असे सांगून आक्रमक पवित्रा घेतला. तसेच या विद्यार्थिनीने हिजाबच्या समर्थनार्थ कॉलेज आवारात घोषणाबाजी सुरू केली.
या प्रकारामुळे कॉलेज आवारात कांही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना समजावून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
दरम्यान, माध्यमिक शाळांमागोमाग आता महाविद्यालयं देखील सुरू झाल्यामुळे सर्व समाजातील जाणकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. शांतता व सलोखा राखावा, असे आवाहन पोलिसांनी आणि शिक्षण खात्याने केले आहे.