धार्मिक आणि भाषिक सलोख्याला धक्का पोहोचवणाऱ्या प्रक्षोभक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी मार्केट पोलिस स्थानकामध्ये दोघांवर आणि बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकामध्ये एकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी मंगळवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
समाजातील कायदा आणि सुव्यवस्था मिळवण्यासाठी व्हाट्सअप फेसबुक ट्विटर व इतर सोशल मीडियावर प्रक्षोभक संदेश काही जणांकडून व्हायरल केले जात आहेत. अशा पोस्ट मुळे धार्मिक आणि भाषिक वाद निर्माण होण्याचा संभव आहे. त्यामुळे पोलिस आणि सोशल मीडियावर बारीक नजर ठेवली आहे.
गेल्या कांही दिवसांपासून हिजाबवरून बरोबर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक खबरदारी घेतली आहे.
शांतता भंग करू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. आत्तापर्यंत बेळगावच्या जनतेने शांतता बाळगली आहे. अशाच प्रकारे यापुढेही सहकार्य करून सर्वांनी काळजीपूर्वक व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर यांचा वापर करावा.
कोणत्याही प्रकारची प्रक्षोभक पोस्ट सोशल मीडियावर अपलोड करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी दिला आहे. प्रक्षोभक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी मार्केट आणि बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.