गोवावेस येथील महापालिकेचा जलतरण तलाव लवकरच भाडेतत्वावर देण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. सदर जलतरण तलावाचा वापर येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत शहरातील एका संस्थेला या तलावाचा तात्पुरता ताबा देण्यात आला आहे.
गोवावेस जलतरण तलावासाठी महापालिकेने दोन महिन्यापूर्वी निविदा प्रक्रिया राबवून अर्ज मागविले होते. मात्र त्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण देत ती रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. सध्या गोवावेस तलावाची जबाबदारी देण्यात आलेल्या संस्थेकडून पुढील 6 महिने तलावाची देखभाल केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सदर जलतरण तलाव महापालिकेच्या मालकीच्या असला तरी गेल्या अनेक वर्षापासून त्याची देखभाल रोटरी क्लबकडून केली जात होती. रोटरी क्लबकडून प्रशिक्षक नियुक्त केल्यामुळे तेथून अनेक जलतरणपटू तयार झाले आहेत. सदर तलावाच्या आवारात स्केटिंग रिंकही आहे.
रोटरी क्लब व महापालिका यांच्यातील या तलावाबाबत झालेल्या भाडेकराराची मुदत संपल्यानंतर त्या तलावाचा ताबा घेण्यात आला होता. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे तलाव बंद करण्यात आला होता.
टिळकवाडी क्लब तसेच जलतरण तलाव या दोन मिळकतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न त्यावेळी महापालिकेने केला होता. त्यापैकी तलावाचा ताबा घेणे महापालिकेला शक्य झाले, पण या कारवाईबाबत महापालिकेकडून गुप्तता बाळगण्यात आली होती. भाडेकराराची मुदत वाढवून मिळावी यासाठी रोटरी क्लब कडून प्रयत्न झाले असले तरी त्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.