सालाबाद प्रमाणे स्विमर्स क्लब बेळगाव आणि ॲक्वेरियस स्विमिंग क्लब बेळगाव यांच्यातर्फे आयोजित वेगळ्या पद्धतीने सक्षम आणि वंचित मुला -मुलींसाठीच्या 20 व्या भव्य मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराला नुकताच उत्साहात प्रारंभ झाला.
शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावाच्या ठिकाणी आयोजित या भव्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पद्मश्री पुरस्कार प्राप्त डाॅ. मदन गोडबोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी बोलताना डाॅ. गोडबोले यांनी आयोजकांकडून या प्रशिक्षण शिबिराद्वारे गेल्या 20 वर्षापासून वेगळ्या पद्धतीने सक्षम आणि वंचित मुलांमध्ये बदल घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी मदत केली जात आहे त्याबद्दल प्रशंसोद्गार काढून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यकारी अभियंता गंगाधर ई., सहाय्यक कार्यकारी अभियंता महांतेश नरसण्णावर, रो. ॲड. सचिन बिच्चू, बसवराज विभुते, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर, सूर्यकांत हिंडलगेकर, राघवेंद्र अनवेकर, राजेश शिंदे, मोमिन जुनैद, मधुकर बागेवाडी, कल्लाप्पा पाटील आदींसह पालक आणि जलतरण प्रेमी उपस्थित होते.
केएलई विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित सदर जलतरण प्रशिक्षण शिबिर येत्या 5 मार्च 2022 पर्यंत दररोज सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये 60 हून अधिक दिव्यांग, अंध, मतिमंद, मूकबधिर आणि गरीब मुला-मुलींचा सहभाग आहे. जलतरण प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त या सर्व मुलांना मोफत जलतरण साहित्य, मोफत वाहतूक व्यवस्था आणि पोषक आहार पुरविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरातील स्पर्धात्मक प्रशिक्षणातून या निवडक प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली असून आता त्यांना पद्धतशीर आणि तंत्रशुद्ध जलतरण प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार करण्यात येत आहे.
सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मेसर्स अलाइड फाउंड्रीच्या सुरेश भट यांचे पाठबळ लाभत आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नीतीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, विनोद दोडमनी, विनायक आंबेवाडीकर आणि प्रसाद वेर्णेकर हे विशेष परिश्रम घेत आहेत.