बेळगाव तालुक्यातील अष्टे, चंदगड परिसरातील नागरिक आणि शेतकर्यांना अनुकूल व्हावे यासाठी अष्टे गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या रेल्वेमार्गाच्या ठिकाणी रेल्वे गेट अथवा अंडर ब्रिज बांधावा, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभाग महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.
यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अष्टे, चंदगड, मुचंडी, खणगाव व कलखांब येथील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी उपरोक्त मागणी केली असून तसे निवेदन आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अष्टे, चंदगड, मुचंडी, खणगाव व कलखांब गावातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर चालते.
सध्या सांबरा रेल्वे स्टेशन येथील गुडशेड रस्त्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे सांबरा दरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरी करणाचे काम सुरू आहे. अष्टेपासून सांबरा गावापर्यंत रस्ता मंजूर झाला असून त्याअंतर्गत येथील बेळ्ळारी नाल्यावर ब्रिजही बांधण्यात आला आहे.
तथापि याठिकाणी असते गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. आपल्या शेतीच्या कामासाठी ये-जा करताना रेल्वेमार्ग ओलांडावा लागत असल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी सदर रस्त्यावरवरील रेल्वेमार्गाच्या ठिकाणी रेल्वेगेट भरण्यात यावे अथवा याठिकाणी अंडर /ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची झालेल्या भेटीप्रसंगी ग्रामस्थांनी मांडलेल्या सदर प्रस्तावाबाबत सर्वांगाने चर्चा करण्यात आली. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना देखील बोलावून घेण्यात आले होते. चर्चेअंती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची लवकरात लवकर पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष बाळू कुरबर, सिद्धू वडेयर आदींसह अष्टे, चंदगड, मुचंडी, खणगाव व कलखांब येथील ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाची प्रत नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभाग महाव्यवस्थापक, बेळगाव रेल्वे विभागीय व्यवस्थापक आदिंना धाडण्यात आली आहे.