Wednesday, January 1, 2025

/

नगरसेवकांची नव्याने होणार राजपत्रात नोंद

 belgaum

बेळगाव महापालिकेच्या 58 नगरसेवकांची नावे नव्याने राजपत्रात नोंद करण्याबाबतचा प्रस्ताव काल सोमवारी कौन्सिल विभागाने नगरविकास खात्याकडे पाठविला असून नगरसेवकांची नावे त्यांचा पक्ष व प्रभाग आरक्षणासह राजपत्रात नमूद करावीत, अशी विनंती करण्यात आली आहे. आता नगरविकास खात्याकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

नगरसेवकांची नावे नव्याने राजपत्रात नमूद झाल्यावरच बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक होईल, तोवर नव्या नगरसेवकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतरच नगरसेवकांची त्यांचा पक्ष व आरक्षणासह राजपत्रात नोंद होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक शंकर पाटील यांनी महापौर -उपमहापौर आरक्षणाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. त्या सुनावणीने कडेही नगरसेवकांचे अधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महापालिकेची निवडणूक गेल्या सप्टेंबरमध्ये झाली आहे. त्याच महिन्यात नगरविकास खात्याने सर्व 58 नगरसेवकांच्या नावांची राजपत्रात नोंद केली. मात्र आता महापौर व उपमहापौर निवडणुकीपूर्वी नवी समस्या उद्भवली आहे. महापालिकेने महापौर निवडणूक घेण्याचा प्रस्ताव 5 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिश्वास यांच्याकडे पाठविला होता. त्यासोबत 65 मतदारांची यादी नगरसेवकांची राजपत्रात नोंद झाल्याची माहिती जोडली होती. परंतु 17 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक आयुक्तांनी महापालिकेला पत्र पाठवून नगरसेवकांची नावे राजपत्रात नोंद करताना त्यांचा पक्ष व प्रभागाचे आरक्षण त्यात नमूद नसल्याचा आक्षेप नोंदवला आहे.

यावेळी महापालिकेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर झाली आहे. त्यात भाजप, काँग्रेस व एमआयएम पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. तथापि राजपत्रात त्यांच्या पक्षाची आणि प्रभाग आरक्षणाची नोंद नाही. महापौर निवडणूक जाहीर करण्याआधी ही माहिती आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विविध कारणांमुळे आधीच महापालिका निवडणूक 5 महिन्यांपेक्षा अधिक काळ रखडली आहे. त्यात आता हा नवा अडथळा निर्माण झाला आहे. महापालिकेने काल सोमवारी नवा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे आता मार्च महिन्यात नगरसेवकांची राजपत्रात नोंद होऊ शकते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.