हिजाब आणि भगवा स्कार्फ यावरून निर्माण झालेल्या तणावामुळे खबरदारी बंद ठेवण्यात आलेली राज्यातील सर्व पदवीपूर्व आणि पदवी महाविद्यालय उद्या बुधवार दि. 16 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.
हिजाब आणि भगव्या स्कार्फ वरून तणाव निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने खबरदारी म्हणून मागील आठवड्यात 9 फेब्रुवारी पासून राज्यातील माध्यमिक शाळा आणि सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. आता काल सोमवारपासून नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
त्यानंतर उच्च न्यायालयाने सूचना केल्याने सरकारने बुधवार दि. 16 फेब्रुवारीपासून पदवीपूर्व आणि पदवीपूर्व महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात गणवेशावरून निर्माण झालेला वाद कांही प्रमाणात निवळला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी उद्यापासून सर्व पदवीपूर्व व पदवी महाविद्यालयं सुरू होणार असल्याची माहिती दिली. उच्च न्यायालयाने सूचना दिल्याने बुधवारपासून महाविद्यालय सुरू केली जात आहेत. सर्वांनी न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन करावे.
विद्यार्थ्यांनी गणवेशच परिधान करून महाविद्यालयात यावे. न्यायालयाच्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. बेंगलोर मधील रेसकोर्स रोडवरील शक्ती भवन येथे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मंत्री बी. सी. नागेश यांच्यासह गृहमंत्री आरोग्य ज्ञानेन्द्र, उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण तसेच शिक्षण आणि गृह खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.