विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेळगाव सांबरा विमानतळावर शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे आगमन झाले. यावेळी विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्यात सध्या सुरु असलेल्या हिजाब प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या वादावर तातडीने तोडगा काढण्याची गरज असून विद्यार्थ्यांमध्ये कोणतेही भेदभाव न करता शाळा महाविद्यालयांना सुरुवात होणे आवश्यक आहे.
यानंतर आगामी काळात सादर केल्या जाणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, अर्थसंकल्प सादरीकरणासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सर्व विभागांची बैठक घेऊन, त्यांच्या मागण्या जाणून घेऊन, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवर अभ्यास करून, तसेच आर्थिक स्रोताचे पुनरावलोकन करून आगामी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
याचप्रमाणे संगोळी येथे सैनिक शाळा सुरु करण्यासंदर्भात देखील संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने दिलेल्या अहवालानुसार ७५० एकर संरक्षक जमिनीवर सदर शाळेच्या निर्मितीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.