अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन येत्या 30 जून 2022 पर्यंत चोर्ला घाटामध्ये अवजड मालवाहू वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी अजीत रॉय यांनी हा आदेश जारी केला आहे.
चोर्ला घाटा येथील राज्य महामार्ग क्र. 1 वरील चोर्ला घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या केरीपासून बेळगावपर्यंतच्या रस्त्यावर अपघाताची संख्या वाढली आहे.
यासाठी दत्तवाडी, साखळीपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत बेळगाव राज्य महामार्ग क्र. 1 या चोर्ला घाटाच्या रस्त्यावर, त्याचप्रमाणे साखळीपासून गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्य महामार्ग क्र. 1 या चोर्ला घाटाच्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असेल. याखेरीज होंडा येथून गोवा राज्याच्या सीमेपर्यंतच्या राज्य महामार्ग क्र. 1 या चोर्ला घाटातील रस्त्यावर अवजड वाहतुकीला येत्या 30 जून 2022 पर्यंत बंदी असणार आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याने आवश्यक सर्व ठिकाणी सूचनाफलक लावण्याबरोबरच चोर्ला घाट येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी युद्धपातळीवर किमान दोन हेवी क्रेन्सची व्यवस्था करावी अशी सूचना करण्यात आली आहे. उत्तर गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी अजीत रॉय यांनी बजावलेल्या उपरोक्त आदेशाची तातडीने अंमलबजावणी होणार आहे.