सागरे व दोड्डेबैल (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी यात्रा 16 वर्षानंतर यंदा होत असून या यात्रेला येणाऱ्या भाविक व पैपाहुण्याकरिता सोयीचे व्हावे यासाठी खानापूर बस आगारामधून तात्काळ बससेवा उपलब्ध करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आली आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज रविवारी खानापूर बस आगार व्यवस्थापकांना सादर करण्यात आले.
सागरे व दोड्डेबैल (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी यात्रा 16 वर्षानंतर यंदा होत आहे. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खानापूर बस आगाराकडून खास बससेवा उपलब्ध करून दिली जावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे
खानापूर बस आगाराचे व्यवस्थापक महेश यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन सादर करतेवेळी बस आगाराचे सहव्यवस्थापक पी. पी. चिमणी, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, राजू कुंभार आदी उपस्थित होते.