बेळगावातील आनंद क्रिकेट कोचिंग अकादमीतर्फे आयोजित 11 वर्षाखालील मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद एम्स अकादमी सावंतवाडी संघाने पटकावले आहे.
भुतरामनहट्टी येथील भगवान महावीर जैन शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम्स अकादमी सावंतवाडी संघाने प्रतिस्पर्धी बेळगाव स्पोर्ट्स क्लब (बीएससी) संघाला 6 गडी राखून पराभूत केले.
प्रथम फलंदाजी करताना बीएससी संघाने 24.3 षटकांत सर्व गडी बाद 109 धावा केल्या. त्यांच्या तिरवीरकरम रेनके याने 23 तर दृढ रायकर व इम्तियाज मंडल यांनी प्रत्येकी 15 धावा काढल्या. संघातर्फे सोहम सावंतने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एम्स सावंतवाडी संघाने 20.3 षटकात 4 गडी बाद 111 धावा काढून सामना 6 गड्यांनी जिंकला. एम्सच्या फरहान आगाने 18 आणि पाटेकरने 31 धावांचे योगदान दिले.
विजेत्या एम्स अकादमी सावंतवाडी संघाचा फरहान वाघा हा ‘सामनावीर’ व ‘मालिकावीर’ किताबाचा मानकरी ठरला. याखेरीज अन्य वैयक्तिक पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे :
उत्कृष्ट फलंदाज – आरुष के., उत्कृष्ट गोलंदाज -उजमा खान, उत्कृष्ट यष्टीरक्षक व क्षेत्ररक्षक -अद्वैत चव्हाण, उदयोन्मुख क्रिकेटपटू -श्लोक. अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात पुरस्कर्ते सुरेश गडकरी, दर्शन गडकरी, स्पर्धा सचिव आनंद करडी, प्रमोद पालेकर, राहुल रेगे, पंच सूनील देसाई व ईश्वर इटगी यांच्या हस्ते सांघीक आणि वैयक्तिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.