आगामी पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन बेळगाव उत्तर मतदार संघामध्ये आमदार निधीमधून शहरात ठिकठिकाणी कूपनलिकांवर नव्याने बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा आज बुधवारी सकाळी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
बेळगाव उत्तर मतदार संघातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी या भागाचे आमदार ॲड. अनिल बेनके हे सातत्याने प्रयत्नशील असून यासाठी शहरात ठिकठिकाणी कूपनलिका खोदण्याबरोबरच पाण्याच्या टाक्या बसविल्या जात आहेत.
जनहितार्थ आमदार निधीमधून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार टेंगीनकेरी गल्ली, कोनवाळ गल्ली, बापट गल्ली, संगमेश्वरनगर, शाहूनगर आणि काळी अमराई अशा ठिकाणच्या कूपनलिकेवर बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण कार्यक्रम आज बुधवारी सकाळी उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. प्रत्येक ठिकाणी नगरसेवक यांच्या हस्ते कूपनलिका आणि टाकीची विधीवत पूजा-अर्चा आणि आरती झाल्यानंतर आमदार बेनके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर बेळगाव विषयी बोलताना आमदार ऍडव्हान्स अनिल बेनके म्हणाले की, बेळगाव उत्तर मतदार संघामध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी गेल्या वर्षभरापासून माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत माझ्या आमदार निधीमधून मतदारसंघात ठिकठिकाणी 50 हून अधिक कूपनलिका खोदून पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत.
त्यापैकी टेंगीनकेरी गल्लीसह पाच -सहा ठिकाणच्या कूपनलिका आणि पाण्याच्या टाक्या आम्ही आज लोकार्पण केल्या आहेत. त्याचप्रमाणे येत्या कांही दिवसात आणखी 10 -15 ठिकाणी कूपनलिका खोदून पाण्याच्या टाक्या बसवल्या जातील. हे काम जवळजवळ पूर्ण झालेले आहे.
या पद्धतीने एकूणच आगामी काळात लोकांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये यासाठी माझे संपूर्ण प्रयत्न असणार असून नागरिकांनीही पाण्याचा सदुपयोग करावा, असे आवाहन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.