बेळगाव शहरातील काकतीवेस परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फलकाला धक्का लागल्याने संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या राज्यात हिजाब – केसरी वाद उफाळला आहे. या दरम्यान हा प्रकार घडल्याने काही समाजकंटकांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काकतीवेस परिसरात असलेल्या रिक्षा स्थानकानजीक सदर फलक उभा करण्यात आला होता. पहाटे किंवा रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हिजाब केसरी वादावरून राज्यासह जिल्ह्यातदेखील तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर तातडीने पोलिसांनी या ठिकाणी भेट देऊन सदर फलक हटविला आहे. पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हि खबरदारी घेतली आहे.
शिवाय या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही सोय नसल्याने हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे कि अनावधानाने कुणाच्या हातून हा प्रकार घडला आहे याचा तपास घेणे अवघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास घेत आहेत.