सीमाप्रश्नाच्या लढ्यामध्ये शिवसेनेने दिलेले योगदान हे कधीही न विसरण्यासारखे असून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी स्वतःचे बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना आज मंगळवारी बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले.
शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौक येथे आयोजित सदर अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी बेळगाव जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि उपशहर प्रमुख प्रवीण तेजम यांनी हुतात्मा स्मारकाचे पूजन करून त्याला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी केरवाडकर आणि तेजम यांच्यासह उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, राजकुमार बोकडे, तानाजी पावशे, गणपत गावडे, राजू कनेरी, बंडू शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते. सम्राट अशोक चौक येथील शिवसेना हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्याबरोबरच शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि उपशहर प्रमुख प्रवीण तेजम यांनी कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळ व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित शिवसेना हुतात्म्यांना अभिवादनाच्या कार्यक्रमात देखील सहभाग दर्शविला. या उभयतांनी कोनवाळ गल्ली येथे पुष्पहार अर्पण करून शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन केले.
गेल्या 1 नोव्हेंबर 1968 रोजी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काळ्या दिनाच्या निषेध फेरीसाठी बेळगावमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारला सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अल्टिमेटम दिला होता सीमाप्रश्न लवकर सोडवावा अन्यथा कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला महाराष्ट्रात फिरकू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर 8 फेब्रुवारी 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई मुंबई येथे आले होते.
त्यावेळी शिवसैनिक मोरारजी देसाई यांना निवेदन देण्यासाठी हजारोच्या संख्येने जमले होते. परंतु त्यांची गाडी वेगाने कार्यकर्त्यांना चिरडत पुढे गेली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलीसांनी कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीहल्ला सुरू केला. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे 67 शिवसैनिक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना दरवर्षी 8 फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये अभिवादन करण्यात येते.