बेळगाव : आरोग्यविभागाच्या वतीने क्षय रोग आणि २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत क्षय रोगासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण सूचना दिल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले, ज्यांचे कोविड अहवाल निगेटिव्ह येत आहेत अशांना ताप देखील येण्याची शक्यता आहे. यामुळे अशा नागरिकांनी टीबी ची चाचणी करून घ्यावी असे जिल्हाधिकारी म्हणाले. भटक्या विमुक्त, डोंगराळ भाग आणि स्थलांतरीत कामगारांच्या मुलांसह कोणतेही मूल पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये. पोलिओ लसीकरणासाठी २३ मोबाईल पथकांची रचना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पल्स पोलिओ उच्चाटनासाठी सर्व तज्ञ, संघ, संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
आर. सी. एच. ओ. डॉ. आर आर गडाद यांनी बोलताना सांगितले कि, २७ फेब्रुवारी रोजी देशभरात पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या लसीकरणादरम्यान कोणतेही मूल लसीपासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी एस व्ही मुन्याळ, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार, कर्मचारी विभाग, हेस्कॉम, महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी, खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे वैद्याधिकारी, कर्मचारी तसेच तालुका स्तरीय अधिकारी, संघ संस्था पदाधिकारी उपस्थित होते.