महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस सध्या गोव्यातील कन्नडिगांकडे विशेष लक्ष देत असून त्यांच्याकडे ते कर्नाटकातील बेळगावच्या भाजप नेत्यांसोबत मत याचना करताना दिसत आहेत.
गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी त्याठिकाणी असलेल्या बेळगावसह कर्नाटकातील कन्नडगांची मते भाजपकडे वळविण्यासाठी सध्या प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्यातील नेतेमंडळी गोव्यात मुक्कामाला आहेत. गोव्यातील कन्नडीगांनी भाजपला मतदान करावे यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी मंत्री उमेश कत्ती, रमेश जारकीहोळी आदी नेते गोव्यातील प्रचार सभांमध्ये मतं याचना करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे भाजपच्या उंबरठ्यावर असलेले खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील हे देखील भाजपसाठी गोव्यामध्ये मत याचना करताना पहावयास मिळत आहेत.
एकीकडे दोन दिवसापूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत माजी आमदार अरविंद पाटील हे संधिसाधू असल्याचा आरोप करून त्यांची महाराष्ट्र एकीकरण समितीमधून हकालपट्टी व्हावी या अनुषंगाने जोरदार चर्चा झाली होती.
मध्यवर्तीची घटक समिती असलेल्या खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती मधील कांही सदस्य अरविंद पाटील यांच्याशी संधान साधून असल्याचा आरोपही त्या वेळी झाला होता. तसेच ठराव पास करून अरविंद पाटील यांच्या बाबत निर्णय घेण्याचे बैठकीत सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अरविंद पाटील सध्या गोव्यामध्ये भाजपच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.
दरम्यान, दुसरीकडे माजी जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोवा येथील भेटीची चर्चा होत असताना आता कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीदेखील फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे संमिश्र चर्चेला उधाण आले आहे.