रायचूर येथील जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्या कायदा क्षेत्रातील संबंधित जबाबदार व्यक्तीवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई केली जावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांकडे केली आहे.
बेळगाव बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी उपरोक्त निवेदन उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून तात्काळ पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या प्रजासत्ताक दिनी रायचूर जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाप्रसंगी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेच्याबाबतीत अनुचित प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे निर्माण झालेला वाद वकील आणि कायदा क्षेत्राच्या प्रतिमेला बाधा पोहोचविणारा आहे.
तेंव्हा सदर प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्या व्यक्तीवर लवकरात लवकर आवश्यक शिस्तभंगाची कारवाई केली जावी. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणाच्या आचरणासंदर्भात आवश्यक निर्देश आणि मार्गदर्शक सूची खालच्या न्यायालयांमध्ये जारी केली जावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. सचिन शिवन्नावर, सरचिटणीस ॲड. गिरीराज पाटील, संयुक्त सचिव ॲड. बंटी कपाही आदींसह बार असोसिएशनचे अन्य सदस्य तसेच दलित नेते उपस्थित होते.