Saturday, January 11, 2025

/

राज्यात भाजपच्या दुसर्‍या फळीची गरज : आम. पाटील -यत्नाळ

 belgaum

राज्यात दुसऱ्या फळीतील नवे भाजप नेतृत्व तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. येडियुरप्पा यांचे युग संपले आहे त्यांच्यासह अन्य कांही नेते निवृत्तीला आले असल्यामुळे राज्यात भाजपचे दुसरी फळी तयार करायला हवी, असे मत विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी व्यक्त केले.

बेळगाव येथे पंचमसाली मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. राज्याचे नेतृत्व बदलायचे असल्यास गुढी पाडव्याला बदलायला कांहीच हरकत नाही असे सांगून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात बोलताना मंत्रीमंडळाचा विस्तार करायचा असेल तर आताच करा नाही तर या मंत्रिमंडळासोबत निवडणुकीला सामोरे जा. निवडणुकांना केवळ 6 महिने असताना मंत्री मंडळ विस्तार केल्यास त्याचा कांहीही उपयोग होणार नाही. तसे झाल्यास मंत्री म्हणून बंगळुरू किंवा राज्यात फिरावे लागेल आणि स्वतःच्या मतदारसंघात दुर्लक्ष होईल, असे ते म्हणाले.

जसं देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे युग संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युग आले. त्याप्रमाणे कर्नाटकामध्ये देखील बी. एस. येडियुरप्पा यांच्या युगसमाप्तीनंतर दुसऱ्याचं युग येणं गरजेचे आहे. त्यासाठी दुसरी फळी तयार करण्याची गरज आहे, असे सांगून माजी मंत्री रमेश जारकीहोळी आमच्या घरी विजापूरला दोन वेळा भोजनासाठी येऊन गेले आहेत. बेळगावला आल्यानंतर मी एकदा त्यांच्या घरी जेवणाला गेलो होतो. जेवण झाल्यानंतर मी खाली आलो त्यावेळी पत्रकारांनी मला घेरले आणि कांही राजकीय डावपेच सुरू आहेत का? अशी विचारणा केली. तेव्हा मी त्यांना तसे कांही नसल्याचे स्पष्ट केले होते असे आमदार पाटील -यत्नाळ यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाला सोडून जाण्याचा माझा अजिबात विचार नाही. त्याचप्रमाणे प्रादेशिक पक्ष काढण्याचा देखील माझा विचार नाही असेही रमेश जारकीहोळी यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे. लहान -मोठ्या गोष्टी होतच असतात आपण त्या सामंजस्याने निकालात काढूया आणि भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करूया असे जारकीहोळी मला म्हणाले आहेत असेही आमदार बसनगौडा यांनी स्पष्ट केले. बेळगाव जिल्ह्यातील भाजपामध्ये दुफळी नाही, दोन गट नाहीत आणि जर असतीलच तर ती समस्या देखील निकालात काढली जाईल. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना का भेटू नये? असा प्रश्न उपस्थित करून राज्याध्यक्ष आणि मुख्यमंत्री जी काही समस्या असेल ती निकालात काढतील, असेही आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी सांगितले.

जर मंत्रीमंडळाचा विस्तार करायचा असेल तर आताच करा नाही तर या मंत्रिमंडळा सोबत निवडणुकीला सामोरे जा केवळ सहा महिने असताना मंत्री मंडळ विस्तार केल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही.मंत्री म्हणून बंगळुरू किंवा राज्यात फिरल्यास स्वतःच्या मतदारसंघात दुर्लक्ष होईल असे ते म्हणाले.राज्याचे नेतृत्व बदलायचे असल्यास गुडी पाडव्याला बदलायला काहीच हरकत नाहीअसेही त्यांनी म्हटले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.