बेळगाव महापालिकेचे नियमित महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर हे सध्या रजेवर असून त्यांच्या विरोधात महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडल्यामुळे दोड्डगौडर यांना सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महापालिकेचे प्रभारी महसूल उपायुक्त म्हणून एम. एस. बन्सी यांची नियुक्ती झाली आहे.
महापालिकेचे प्रभारी महसूल उपायुक्त म्हणून नुकतीच एम. एस. बन्सी यांची नियुक्ती झाली आहे. काल शुक्रवारी त्यांनी आपला पदभार देखील स्वीकारला आहे. नियमित महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर हे सध्या रजेवर असून त्यांच्या विरोधात गुरुवारी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले.
त्यामुळे दोड्डगौडर यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासन एम. जी. हिरेमठ यांनी घेतला आहे. दरम्यान दोड्डगौडर यांना पालिकेच्या सेवेतून मुक्त करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा लागणार आहे.
जिल्हाधिकारी तो प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवणार असून तेथे त्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे दोड्डगौडर यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त करण्यास विलंब लागणार आहे.
बेळगाव महापालिकेमध्ये सध्या एम. एस. बन्सी हेच एकमेव केएएस अधिकारी असल्यामुळे त्यांची प्रभारी महसूल उपायुक्त म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय मनपा आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी घेतला आहे. बन्सी हे यापूर्वी महापालिकेत कौन्सिल सेक्रेटरी पदावर कार्यरत होते. त्यांच्या निवृत्तीला केवळ चार महिन्याचा कालावधी शिल्लक असल्यामुळे त्यांनी प्रभारी महसूल उपायुक्त पदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र तरीदेखील आयुक्तांनी बन्सी यांच्यावरच ती जबाबदारी सोपविली आहे.