बेळगाव शहरातील गांधीनगर येथील जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटच्या विरोधात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची धार आणखी तीव्र झाली असून जय किसानच्या विरोधात भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष शेतकरी नेते सिद्धगौड मोदगी यांनी आज सोमवारपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
गांधीनगर येथील खाजगी भाजी मार्केटच्या विरोधात एपीएमसी भाजी मार्केट मध्ये दुकानदारांनी आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत त्या खाजगी भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी केला आहे.
त्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून आता भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौड मोदगी यांनी त्यांना पाठिंबा देऊन आमरण उपोषण सुरु केले आहे. परिणामी जय किसान भाजीमार्केट विरोधातील आंदोलनाची धार आणखी तीव्र झाली आहे.
बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने आज एपीएमसी येथील आंदोलन स्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी बोलताना सिद्धगौडा मोदगी यांनी गेल्या चार दिवसापासून एपीएमसी समोर दिवस-रात्र आंदोलन सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनासह संबंधित अधिकारी यासंदर्भात काहीच पाठपुरावा करताना दिसत नाहीत. जय किसान भाजीमार्केटमुळे एपीएमसी अधिकृत भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर पर्यायाने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हा अन्याय जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे, असे स्पष्ट केले.
मोदगी यांच्या समर्थनार्थ उपोषणास बसलेल्या एका व्यापाऱ्याने अडीच वर्षांपूर्वी 84 एकर जमिनीमधील 14 एकर जागेमध्ये सरकारने 80 कोटी खर्च करून अद्ययावत भाजी मार्केटची उभारणी केली. हे दक्षिण भारतातील प्रथमच दर्जाचे हायटेक भाजी मार्केट आहे. मार्केटच्या उभारणीनंतर निविदा मागून सर्व व्यापाऱ्यांना गाळे घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार व्यापाऱ्यांनी गाळे घेतले आणि त्याद्वारे सरकारला 40 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे असे सांगून गेली 2 वर्षे एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापार सुरळीत सुरू असताना आता अन्यत्र स्वतंत्र भाजी मार्केट सुरू करण्याचे प्रयोजन काय? असा संतप्त सवाल केला.
दरम्यान, खाजगी कोणत्याही भाजी मार्केटला परवानगी देऊ नये म्हणून एपीएमसीमध्ये तीन वेळा ठराव मांडून प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. गांधीनगर येथील खाजगी भाजी मार्केटमुळे एपीएमसीवर फार मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. आमच्या ठरावाचा पाठपुरावा प्रशासनाने केला नाही. परिणामी लाचखोर भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे एपीएमसीमधील दुकानदारांवर आणि एपीएमसीवर सध्या ही वेळ आली आहे, असे मत एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम यांनी व्यक्त केले आहे.