बेळगाव शहरातील वीरभद्र नगरातील जेल परिसर कॉलनीमध्ये तीन दिवसांपासून झाडाझुडपात अडकून पडलेल्या एका वासराची एसडीआरएफच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने सुखरूप सुटका केल्याची घटना काल रात्री घडली.
शहरातील पोलिस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या वीरभद्र नगरातील जेल परिसर कॉलनीमध्ये तीन दिवसापासून एक वासरू झाडाझुडपात अडकून पडले होते. असहाय्य अवस्थेत हंबरडा फोडत असलेल्या या वासराबद्दल स्थानिक रहिवाशांनी काल मंगळवारी रात्री प्रभाग क्र. 12 चे नगरसेवक बाबाजान मतवाले यांना माहिती दिली. तेंव्हा नगरसेवक मतवाले यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होऊन प्रथम त्या वासराची पोटापाण्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर याबाबत एसडीआरएफच्या कार्यालयाला माहिती दिली.
एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी आपल्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
तसेच दोर व अन्य साहित्याच्या सहाय्याने झाडाझुडपात अडकलेल्या त्या वासराची सुखरूप सुटका केली. याबाबत माहिती देताना अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी वीरभद्रनगरात वासरू अडकून पडल्याची माहिती देणारा फोन आम्हाला आला.
त्यानूसार येथे येऊन आम्ही त्या वासराची सुटका केली असून ते सुखरूप असल्याचे सांगितले. याप्रसंगी नगरसेवक बाबाजान मतवाले यांच्यासह स्थानिक नागरिक, एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच मार्केट पोलिस स्थानकाचे पोलीस उपस्थित होते.