बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी 10 -10 लाख रुपये घेऊन ‘एनए’ नसताना नवे खाजगी भाजी मार्केट उभारण्यास परवानगी दिली, ती कशी दिली? असा गेले महिनाभर जाब विचारून देखील कोणतेच समाधानकारक उत्तर दिले जात नाही अथवा तोडगाही काढला जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन ठिय्या आंदोलन छेडण्यात बरोबरच अधिकारी आणि संचालकांना कार्यालयात कोंडून घातल्याची घटना आज गुरुवारी दुपारी एपीएमसी मार्केट यार्ड येथे घडली.
बेळगाव शहरात अलीकडे एपीएमसी भाजी मार्केट बरोबरच गांधीनगर येथे जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन भाजीमधील वाद सुरू आहे. नव्या जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटमुळे बळेगाव एपीएमसी मार्केटचे दरमहा 2.5 लाख रुपयांचे नुकसान होत आहे. एपीएमसी संचालक आणि व्यापार यांना विश्वासात न घेता जय किसान भाजी मार्केटला परवानगी देण्यात आली असल्यामुळे त्या भाजी मार्केटचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करत मोठ्या संख्येने जमलेल्या व्यापाऱ्यांनी आज दुपारी एपीएमसी सेक्रेटरीसह संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. खाजगी भाजी मार्केटला परवाना दिला जाऊ नये असा ठराव पास झालेला नसताना परवानगी का देण्यात आली? संगनमताने पैसे खाऊन अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे जय किसान भाजी मार्केटला परवाना दिला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावर बोलताना एपीएमसी अध्यक्षांनी जय किसान भाजी मार्केटला परवाना द्यावा असा कोणताही ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्याच प्रमाणे एकाही संचालकाने त्या भाजी मार्केटला मदत केलेली नाही. जर आमच्यातील कोणी त्यात सामील आहे असे वाटत असेल तर ते निदर्शनास आणून द्यावे. त्याचप्रमाणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांपैकी कोणी त्यामध्ये सामील असल्यास तसे निदर्शनास आणून द्यावे.
संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असेही अध्यक्षांनी सांगितले. याखेरीज कोणालाही परवाना द्यायचा असेल तर तत्पूर्वी संचालक मंडळाची मंजुरी घ्यावी अशा आशयाचा ठराव गेल्या 2020 मध्येच संमत करण्यात आला आहे. त्यानंतर दोन वेळा जयकिसान भाजी मार्केटला परवानगी देऊ नये असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भातील तपशीलवार अहवाल तसेच एपीएमसी भाजी मार्केट बंद झाल्यास सरकारला किती नुकसान होईल याची सर्व माहिती जिल्हाधिकारी तसेच मंत्री महोदय आणि खात्याच्या संचालकांना देण्यात आली आहे. थोडक्यात जय किसान भाजी मार्केटला संचालक मंडळाचा अजिबात पाठिंबा नसल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
आपली बाजू मांडताना एपीएमसी सेक्रेटरींनी जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटचा परवाना रद्द करावा, अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्तांकडे केली असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्तांनी जर खाजगी भाजी होलसेल भाजी मार्केट रद्द करण्याचा अहवाल सरकारला दिला तर ते नव्याने झालेले भाजीमार्केट रद्द होऊ शकते, अशी माहिती एपीएमसीचे सेक्रेटरींनी दिली. तसेच खासगी भाजी मार्केट आणि एपीएमसी भाजी मार्केट समन्वयाने चालावेत अशी आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
सेक्रेटरी यांच्या या उत्तरामुळे उपस्थित व्यापाऱ्यांमधील अस्वस्थता आणखीनच वाढली. अधिकारीवर्ग आणि संचालकांकडून कोणतेच ठोस उत्तर अथवा निर्णय जाहीर केला जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी निषेधाच्या घोषणा देऊन एपीएमसी कार्यालय दणाणून सोडले. कार्यालयातच ठिय्या आंदोलन छेडणाऱ्या व्यापाऱ्यांनी तेवढ्यावरच न थांबता आक्रमक पवित्रा घेऊन जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करावा अशी मागणी करत अखेर अधिकारी आणि संचालकांना कार्यालयातच डांबून घातले.