आपल्या शहरात अनेक खाजगी ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल्स आहेत. यामागे प्रत्येकाचा व्यावसायिक दृष्टिकोन असतो. तथापि निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन न बाळगता युवती -विद्यार्थिनींसह गृहिणींच्या मनातील दुचाकी चालवण्याच्या सुप्त इच्छेला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी धडपडण्याच्या वृत्तीमुळे शितल प्रभावळकर या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात.
आपण उत्तम दुचाकी चालवत शकतो हे कौशल्य आपण इतर महिलांना का शिकवू नये? या विचारातून दुचाकी प्रशिक्षणाकडे वळलेल्या शितल प्रभावळकर या युवती, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि विशेष करून गृहिनीवर्गाला दुचाकीचे प्रशिक्षण देणाऱ्या उत्तम प्रशिक्षिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या शितल ड्रायव्हिंग स्कूलमध्ये बेळगावसह हिरेबागेवाडी, सांबरा आदी परिसरातील महिला, मुली, विद्यार्थिनी दुचाकी शिकण्यासाठी येत असतात.
आपल्या दुचाकी चालविण्याच्या प्रशिक्षणाद्वारे शितल प्रभावळकर यांनी आतापर्यंत 400 ते 500 महिलांना दुचाकी चालविण्यात तरबेज केले आहे. यामध्ये वयस्क महिलांचाही समावेश आहे. साधी सायकल देखील न चालवता न येणाऱ्या अथवा दुचाकीच्या आवाजाने घाबरणाऱ्या महिलांमध्ये शीतल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रशिक्षण पद्धतीने अवघ्या एक -दोन दिवसात दुचाकी चालविण्याचा आत्मविश्वास निर्माण करतात हे विशेष होय.
शहरातील रेलनगरच्या डबल रोडवर दुचाकी चालविण्याचे धडे देणाऱ्या शितल प्रभावळकर या स्वतः गृहिणी आहेत. बेळगाव लाईव्हशी बोलताना आपण दुचाकी प्रशिक्षक कशाला झालो? याची माहिती देताना शितल म्हणाल्या की, बऱ्याच महिला आणि मुलींच्या मनात दुचाकी शिकण्याची खूप इच्छा असते परंतु पती किंवा अन्य नातलगांकडून त्यांना हवे तसे सहकार्य मिळत नाही. ही बाब माझ्या निदर्शनास येताच आपल्याला दुचाकी चालवता येते ती आपण दुसऱ्या महिलांना का शिकवू नये? असा विचार करून मी या क्षेत्राकडे वळले प्रारंभी मैत्रिणींना शिकवण्यास सुरुवात केली.
त्यांना माझी दुचाकी शिकवण्याची पद्धत अतिशय आवडली. तिथून माझ्या दुचाकी प्रशिक्षणाची मौखिक प्रसिद्धी झाली आणि माझ्याकडे प्रशिक्षण घेण्यास येणाऱ्या महिला व मुलींची संख्या वाढू लागली असे शीतल यांनी सांगितले. आतापर्यंत मी जवळपास 400 ते 500 महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये वयस्क महिला देखील असून ज्यांना सायकल ही चालवता येत नाही अशा महिलांना मी गाडीवर तोल सांभाळण्यापासून व्यवस्थित दुचाकी चालवता येईल इतपत प्रशिक्षण दिले आहे.
बऱ्याच महिला दुचाकी सुरू करताच तिच्या आवाजामुळे घाबरून गर्भगळीत होतात अशा महिलांना मी उताराच्या रस्त्यावर डाऊनलला बंद अवस्थेतील गाडी चालवावयास लावून आपण गाडी चालवू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करते. त्यानंतर त्यांना मैदानावर गाडी चालविण्याचे प्रशिक्षण देते. दुचाकी चालविण्यास शिकवण्यापूर्वी प्रशिक्षणार्थीमध्ये आपण गाडी चालवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणे यावर माझा अधिक भर असतो. नवोदित महिला दुचाकीच्या एक्सलेटर आणि ब्रेकच्या बाबतीत अत्यंत विसरभोळ्या असतात. या दोन्ही गोष्टींचा वापर कसा करावा हे त्यांना वारंवार सांगून देखील कळण्यास वेळ लागतो. हे लक्षात घेऊन त्याबाबतीत मी माझे असे ‘वन, टू, थ्री’ हे वेगळे तंत्र अवलंबते. ज्यामुळे प्रशिक्षणार्थी महिलांना एक्सलेटर व ब्रेकचा वापर कसा करायचा हे त्वरित समजते, असे शितल प्रभावळकर यांनी स्पष्ट केले.
मी गृहिणी असून मला पती आणि माझी दोन मुले असा संसार आहे. त्यामुळे घरही सांभाळावे लागते. यासाठी दिवसभरात दोन सत्रांमध्ये मी दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देते. पहिल्या सत्रातील प्रशिक्षण सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत चालते. त्यानंतर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मी माझी स्वयंपाक वगैरे घरगुती कामे आटपून घेते. त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुसऱ्या सत्रात प्रशिक्षण वर्ग घेते. या दोन सत्रात प्रत्येकी अर्धा तास याप्रमाणे माझे प्रशिक्षण चालते. ही दोन सत्रे यासाठी आहेत की सकाळच्या सत्रात नोकरदार महिला प्रशिक्षणासाठी येऊ शकतात, तर दुपारच्या वेळेत घरकाम आटपून गृहिणीवर्ग दुचाकी चालविण्यास शिकण्याची आपली इच्छा पूर्ण करून घेऊ शकतात, अशी माहितीही शितल प्रभावळकर यांनी दिली.