वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमी वाघ आज रात्रीपासून राज्यभरात वीकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला असला तरी नाशवंत माल असल्याकारणाने बेळगावातील होलसेल भाजी मार्केट आणि कांदा मार्केट कोरोनाचे नियम पाळून खुले ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. यामुळे शहर परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने विकेंड कर्फ्यू जारी केला असून जो आज शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून येत्या सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत अंमलात आणला जाणार आहे. सरकारने विकेंड कर्फ्यू लागू केल्यामुळे बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील भाजी आणि कांदा खरेदी विक्रीची मुख्य केंद्रे असणारी बेळगावची बाजारपेठ खुली असणार की नाही? याबाबत शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. गांधीनगर बेळगाव येथील जय किसान होलसेल भाजी मार्केटमध्ये के. के. कोप्प, बागेवाडी, हुबळी-धारवाड, कित्तूर आदी ठिकाणांहून तसेच राष्ट्रीय महामार्गावरील जवळपास सर्व गावांमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो. सध्या तालुक्यात रताळ्यांची काढणी सुरू असताना विकेंड कर्फ्यू लागू झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले होते. तथापि मिळालेल्या माहितीनुसार भाजीपाला कांदा वगैरे नाशवंत मालाचा असल्यामुळे त्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बेळगावातील गांधीनगर येथील जय किसान होलसेल भाजी मार्केट नेहमीप्रमाणे उद्या पहाटे 5 -5:30 वाजल्यापासून खुले राहणार आहे. त्याचप्रमाणे एपीएमसी येथील कांदा मार्केट देखील नेहमीच्या वेळेनुसार सुरू राहणार आहे.
जय किसान होलसेल भाजी मार्केट येथील व्यापारी सुनील भोसले यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना भाजीपाला हा नाशवंत असल्यामुळे प्रशासनाने वीकेण्ड कर्फ्यूमधून त्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे उद्या पहाटेपासून भाजी मार्केट खुले राहणार आहे.
तथापि कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मार्केट खुले राहील. त्यानंतर पुन्हा दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील, असे सांगितले. दर सोमवारी बाहेरील शेतकरी येत नसल्यामुळे त्यादिवशी फक्त स्थानिक शेतकऱ्यांसाठी सकाळी खुले ठेवण्यात येणारे भाजी मार्केट दुपारनंतर बंद असते, अशी माहितीही भोसले यांनी दिली.