बेळगाव शहरात दर शनिवारी भरणाऱ्या कोंबडी बाजाराला विकेंड कर्फ्यूचा फटका बसत असून या कर्फ्यूमुळे कोंबडी व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
बेळगावमध्ये दर शनिवारी भरणाऱ्या कोंबडी बाजारात खरेदी -विक्रीसाठी मोठी गर्दी होते. तथापी वीकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कोंबडी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.
शनिवार हा कोंबडी बाजाराचा प्रमुख दिवस असतो. परंतु विकेंड कर्फ्यूमुळे शनिवारी संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येत असल्यामुळे कोंबडी व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून काहींच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे.
दरम्यान यासंदर्भात बोलताना आलम पुंडेकर हा व्यापारी म्हणाले की, बेळगावच्या कोंबडी बाजारांमध्ये संकेश्वर, हुकेरी आदी ठिकाणाहून लोक कोंबड्या खरेदी-विक्रीसाठी येत असतात. मात्र विकेंड कर्फ्युमुळे सध्या बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
कोंबड्यांचे दर अलीकडे वाढले आहेत, पूर्वी 300 रुपयांना मिळणारी कोंबडी आता 400 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे एका कोंबड्याचा दर 400 रुपयावरून 500 रुपये इतका झाला आहे. जोडीला 600 रुपये मोजावे लागायचे मात्र आता हा दर 800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
त्यामुळे ही दरवाढ व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठी अडचणीची ठरत असताना आता भरीस भर म्हणून विकेंड लॉक डाउन जारी झाल्यामुळे अधिकच अडचण निर्माण झाली आहे. एकंदर कोविड परिस्थिती बरोबरच सध्याच्या वीकेंड कर्फ्यूमुळे प्रत्येक शनिवारी भरणाऱ्या बेळगावमधील कोंबडी बाजाराची परिस्थिती मात्र अतिशय बिकट झाली आहे.