खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या सोमवार दि. 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन आचरण्यात येणार असून कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पत्रकावर समितीच्या दोन्ही गटप्रमुख यांच्या स्वाक्षऱ्या असल्यामुळे यंदाचा हुतात्मा दिन या दोन्ही गटांना एकत्र करणार का? याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुका यांच्यातर्फे येत्या सोमवार दि. 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन आचरण्यात येणार आहे. तेंव्हा समस्त मराठी भाषिकांनी हुतात्मा दिनाचे गांभीर्याने आचरण करून सोमवारी कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटाचे अध्यक्ष अनुक्रमे देवाप्पा गुरव आणि माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या सदर प्रसिद्धी पत्रकावर स्वाक्षर्या आहेत.
खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये गेल्या कांही वर्षापासून पडलेली फूट सर्वश्रूत आहे. मात्र प्रसिद्धीपत्रकावरील दोन्ही गटप्रमुखांच्या स्वाक्षर्या पाहता आगामी 17 जानेवारीचा हुतात्मा दिन दोन्ही गटांना एकत्रित करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, येत्या सोमवारी 17 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता खानापूर स्टेशन रोड येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व सीमा सत्याग्रही आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास हजर रहावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे समिती नेते देवाप्पा गुरव आणि माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे.