कर्नाटक राज्य कोविड-19 वाॅर रूमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ग्रामीण विभागात बेळगाव जिल्ह्यातील दोन गावांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सांबरा आणि बाळेकुंद्री खुर्द अशी या दोन गावांची नावे आहेत.
गेल्या चार आठवड्यांमध्ये साबरा गावात नव्याने एकूण 17 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे बाळेकुंद्री खुर्दमध्ये गेल्या आठवड्यातील 13 रुग्णांसह चार आठवड्यात एकूण 20 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. बेळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट गेल्या 11 जानेवारी 2022 रोजी 6.29 टक्के तर संपूर्ण राज्याचा एकूण 16.78 टक्के इतका होता.
सध्या जिल्ह्यात प्रतिदिन 5000 कोरोना तपासण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्हिटी रेटच्या तुलनेत बेळगाव राज्यात 21 व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात काल 12 जानेवारी रोजी नव्याने एकूण 269 कोरोना पीडित आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 961 वर पोचली होती.
कर्नाटक राज्य कोविड-19 वाॅर रूमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ग्रामीण विभागात एकूण 14 गावांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या गावांमध्ये बेंगलोर शहरी भागातील बोंमिनिहळ्ळी, अवळहळ्ळी, के.जी. काग्गलीपुरा, दोड्डथोगुर, हरपनहळ्ळी, दोड्डनागमंगला, काननमंगला, कोनाप्पांना अग्रहार व साजापूरा या गावांसह सांबरा (बेळगाव), कुरबुरा शेट्टीहळ्ळी (मंड्या), बाळेकुंद्री खुर्द (बेळगाव) आणि होसकेरी (कोडगु) या गावांचा समावेश आहे.
यापैकी बेंगलोर शहरी भागातील दोड्डथोगुर येथे गेल्या चार आठवड्यात राज्यात सर्वाधिक 214 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.