बीम्स हॉस्पिटल आणि नर्सिंग कॉलेजमधील 45 कर्मचाऱ्यांसह 20 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चांचण्या वाढविण्याची सूचना असल्याने पोलीस आणि सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरटी -पीसीआर चांचणी केली जात आहे.
त्यामध्ये अनेक जण बाधित आढळत आहेत. काल शनिवारी जिल्ह्यातील 1066 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आता बीम्स हॉस्पिटलमधील 20 डॉक्टरांना तसेच नर्सिंग कॉलेजमधील 45 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
या सर्व बाधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे होम आयसोलेशन करून उपचार केले जात आहेत, अशी माहिती बीम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. बी. पाटील यांनी दिली आहे.
नर्सिंग कॉलेजमधील कोरोना निगेटिव्ह कर्मचाऱ्यांची बीम्स रूग्णालयात तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठल्यामुळे उर्वरित डॉक्टर, कर्मचारी विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.