एका ट्रकला झालेल्या अपघातामुळे चोर्ला घाटामध्ये तब्बल 4 तास वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना आज सकाळी घडली.
चोर्ला घाटात एका ट्रकला झालेल्या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याची घटना आज सकाळी घडली. घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यासाठी वाहनचालकांना तब्बल सुमारे 4 तास वाट पाहावी लागली.
मात्र दरम्यानच्या काळात रस्त्याच्या दोन्ही बाजूला कारगाड्या, बसेस, ट्रक, टिप्पर आदी वाहनांच्या एक-दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अखेर आलटून पालटून एका बाजूची वाहतूक सुरू करण्याद्वारे घाटात झालेली वाहतुकीची कोंडी फोडण्यात आली.
तथापि या वाहतूक कोंडीमुळे तातडीच्या कामासाठी बेळगावहून गोव्याकडे आणि गोव्याहून बेळगावकडे येणाऱ्या वाहन चालकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विकेंड कर्फ्युच्या निमित्ताने बेळगावमधून अनेकजण गोव्याला गेले होते त्यांनाही याचा फटका बसला आहे.