आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रामदुर्ग तालुक्यातील 3 बालकांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. या दुर्देवी खळबळजनक घटनेची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांनी सविस्तर अहवाल मागविला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात बालकांना रूबेला इंजेक्शन दिल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे संपूर्ण जिल्हा व राज्यभर पसरल्याने एकच खळबळ उडाली होती.रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ व मल्लापुर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांना गोवर प्रतिबंधक रूबेला इंजेक्शन देण्यात आले होते. सदर इंजेक्शन दिलेल्या 17 बालकांपैकी 3 बालकांचा मृत्यू झाला होता.
रामदुर्ग तालुक्यात घडलेल्या या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण घटनेसंबंधी सविस्तर अहवाल देण्याची सूचना केली आहे.
मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या मोबाईल संभाषणानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत लसीचे कोल्ड चेन तुटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अहवाल मागितला होता. आता मुख्यमंत्र्यांनीही या घटनेसंबंधी जिल्हाधिकार्यांकडून अहवाल मागविला आहे.
रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ व मल्लापुर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोवर प्रतिबंधक लसीकरण झाल्यानंतर बोचबाळ येथील तेरा महिन्याची पवित्रा 14 महिन्यांचा मधु व मल्लापूर येथील 14 महिन्यांचा चेतन या बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे 15 महिन्यांची नंदिनी ही अत्यवस्थ असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. डाॅ. ईश्वर गडादी यांनी एकूण घटनेसंबंधी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल दिला आहे.
उपलब्ध माहितीनुसार 10 जानेवारी रोजी औषध वितरक जयराज कुंभार यांच्याकडून सालहळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एएनएम सलमा महात यांनी एक लस घेतली. लहान मुलांना लस देऊन बाटलीत उरलेली लस आरोग्य विभागाच्या फ्रीजरमध्ये ठेवायला हवी होती. मात्र महात यांनी ती बाटली एका हॉटेलमधील फ्रीजमध्ये ठेवली. त्यानंतर 11 जानेवारी रोजी मल्लापुर येथे चेतन या मुलाला देण्यात आली. त्याच दिवशी चेतनचा मृत्यू झाला. लसीमुळे लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती होऊनही सलमा यांनी 12 जानेवारी रोजी 21 मुलांना त्याच बाटलीतील लस दिली. त्यापैकी चार मुले अस्वस्थ झाली चार पैकी दोघा जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डाॅ. सिद्धलिंगय्या व डाॅ. प्रभु बिरादार यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान सोमवारी यासंबंधी एएनएम सलमा महात आणि औषध वितरक जयराज कुंभार यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या फ्रीजमध्ये न ठेवता हॉटेलच्या फ्रीजमध्ये लस ठेवल्यामुळे चेन ब्रेक होऊन ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. यामुळे आरोग्य विभागातील आणखी कांही जणांवर कारवाई होणार आहे.