आरपीडी कॉर्नर टिळकवाडी येथील एका बाजूचे सातत्याने सांडपाण्याने तुंबणारे परिणामी दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनलेले गटार गेल्या कित्येक महिन्यांपासून आसपासचे नागरिक आणि दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरले असून याकडे लोकप्रतिनिधींसह कोणीच लक्ष देत नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टिळकवाडी आरपीडी कॉर्नर येथील एका बाजूचे अगदी कोपऱ्यावरील गटार आसपासच्या लोकांसाठी मनस्ताप देणारे ठरत आहे. या सांडपाण्याने तुंबलेल्या गटारीमुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण तर असतेच शिवाय डास आणि माशांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून सदर गटार सातत्याने तुंबत असते. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील लोकप्रतिनिधींसह महापालिका अधिकाऱ्यांकडून या समस्येचे निवारण करण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी गेल्या कांही महिन्यांपासून नागरिक व याभागातील दुकानदारांनी तक्रार करणे देखील बंद करून टाकले आहे.
मनपा सह स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्यामुळे आरपीडी कॉर्नरवरील हे गटार दुर्गंधी व अस्वच्छतेचे केंद्र बनले आहे. येथील दुकानदार आणि नागरिकांनी अलीकडे स्वतःच पर्याय शोधून काढताना या तुंबलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर वाहू नये यासाठी रस्त्याशेजारी मातीचा बांध घातला आहे. मात्र इतके करून दुर्गंधी आणि गलिच्छ तिची जी समस्या आहे ती अद्यापही ‘जैसे थे’च आहे.
उलट मातीचा बांध घातल्यामुळे सांडपाणी एका जागीच तुंबून राहिल्यामुळे दुर्गंधी तर प्रचंड वाढलीच आहे, शिवाय डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आसपासचे दुकानदार आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तेंव्हा आता तरी स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी जागे होऊन सातत्याने तुंबणारे या गटारीची समस्या कायमची निकालात काढावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.