गेल्या डिसेंबर महिन्यात बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन करणाऱ्या 38 जणांपैकी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 36 जणांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर सुनावणी होऊन सर्व 36 जणांना न्यायालयाने गुन्हा क्र. 201/21 मध्ये सशर्त जामीन मंजूर केला आहे.
बेंगलोर येथे गेल्या डिसेंबर महिन्यात घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन करणाऱ्या 38 जणांवर मार्केट पोलिस ठाण्यांमध्ये इतर गुन्ह्यांसह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करून कारागृहात डांबण्यात आलेल्या या सर्वांपैकी दोघा जणांना यापूर्वीच जामीन मिळाला होता.
श्री राम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह उर्वरित 36 जणांच्या जामीन अर्जावर गेल्या सोमवारी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज गुरुवारी सदर सुनावणी होऊन अर्ज केलेल्या सर्व 36 जणांना भा.द.वी. 307 कलमाचा समावेश असणाऱ्या गुन्हा क्र. 201/21 मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर व मयूर बसरीकट्टी यांना देखील आय पी सी 307 मधून उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.या संशयित युवकांची वकील ॲड. नागरत्ना एस पत्तार आणि ॲड. शामसुंदर पत्तार यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली.
जामीन मंजूर झालेल्यांमध्ये रमाकांत कोंडुसकर, भारत मेणसे, बळवंत शिंदोळकर, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक ईश्वर सुतार, सुनील लोहार, रोहित माळगी, विनायक संजय सुतार, गजानन जाधव, विनायक उर्फ मायाप्पा कोकितकर, दयानंद बडसकर, सुरज गायकवाड, राहुल बारले, लोकनाथ उर्फ लोकेश रजपुत, महेश मुतगेकर, नागेश काशिलकर, राहुल सावंत, सिद्धू उर्फ श्रीधर गेंजी, गणेश येळ्ळूरकर, विकी उर्फ होल्लो मंडोळकर, सुरज शिंदोळकर, भालचंद्र बडसकर, विनायक हुलजी, राजा गुरव, हरीश मुतगेकर, बागेश नंद्याळकर, ऋतिक पाटील, अभिषेक पुजेरी, राजेंद्र बैलूर, श्रेयस उर्फ सोनू खटावकर व शशिकांत आरकेरी यांचा समावेश आहे.