जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी तीन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत असून त्यावरून वाहने चालविणे धोकादायक बनत चालले आहे.
जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी 24 जानेवारी 2017 रोजी बांधकामाला सुरुवात करण्यात आलेला हा रेल्वे ओव्हर ब्रीज 6 एप्रिल 2018 रोजी जनतेसाठी खुला करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिकेत ठराव करून या ब्रीजचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे ओव्हर ब्रीज असे नामकरण करण्यात आले.
या रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याच्या निकृष्टतेचे पितळ अलीकडच्या काळात उघडे पडू लागले आहे. सध्या या ब्रिजच्या रस्त्यावर ठिकठिकाणी जीव घेणे खड्डे पडण्याबरोबरच डांबरीकरण उखडून दुरवस्था झाली आहे. याखेरीज रस्त्यावरील लोखंडी सांध पट्ट्या निखळून खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे आव्हानात्मक ठरत आहे.
सदर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे ओव्हरब्रिज 40 फूट रुंद असून केपीआर कन्स्ट्रक्शन या हैदराबादच्या कंपनीने तो 14 महिने 12 दिवसात बांधून पूर्ण केला आहे. सदर 24 कोटी रुपये खर्चाच्या ब्रिजला 14 पिलर अर्थात खांब असून त्यापैकी 10 पिलर रूपाली हॉल पर्यंत तर 4 जिजामाता चौकापर्यंत आहेत. या भव्य ब्रिजवरील रस्त्याची गेल्या दोन वर्षापासून वाताहात होण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासह सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ब्रिजवरील रस्ता अपघात प्रवण बनू लागला आहे. तरी या भागाच्या लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतातरी आपले डोळे उघडावेत आणि या ब्रिजवरील रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.