प्रशासनाचे अटी -नियम आणि कोरोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करून विकेंड कर्फ्यू वगळता आपण अवश्य संमेलनांचे आयोजन करू शकता, अशी दिलखुलास संमती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजनासाठी दिली आहे.
दरवर्षी बेळगावसह सीमा भागात आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या आयोजनासाठी अधिकृत परवानगी मिळावी यासाठी बेळगाव जिल्हा मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करून साहित्य संमेलनांच्या आयोजनात परवानगी देण्याची विनंती केली.
त्यावेळी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी वरील प्रमाणे संमती देताना नियमांचे पालन करून आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाला प्रशासन कोणतीही आडकाठी करणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये बेळगाव तालुक्यातील कडोली, उचगाव, बेळगुंदी, निलजी, कुद्रेमनी व सांबरा या गावांमध्ये त्याचप्रमाणे माचीगड (ता. खानापूर), शेट्टीहळ्ळी (ता. चिकोडी) आणि कारदगा (ता. हुक्केरी) याठिकाणी गेल्या चार दशकांपासून मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते.
ही संमेलने म्हणजे पूर्णपणे साहित्यिक मेळावा असतो. या संमेलनांमध्ये मराठीसह कन्नड आणि उर्दू भाषिक लोकही सहभागी होत असतात. एक दिवसाची ही साहित्य संमेलने कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. या संमेलनांना सरकारकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. लोकवर्गणीतून ही संमेलने भरविली जातात.
मराठी साहित्य संमेलन म्हणजे आमची साहित्य जत्रा -उत्सव आहे. ही आमची संस्कृती ओळख आहे. दरवर्षी आम्ही हा उत्सव साजरा करतो. त्यामुळे यावर्षीही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यास परवानगी दिली जावी. सरकार आणि प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून या संमेलनांचे आयोजन केले जाईल अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद करून संमेलनासाठी रीतसर परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात संमती देण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक संमेलनांच्या तारखांची यादी मला द्या. जेणेकरून संबंधित पोलीस स्थानकात मी त्यासंदर्भात सूचना देईन असेही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या संमतीमुळे सर्व मराठी साहित्य संमेलन सुरळीतपणे पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवेदन सादर करतेवेळी बेळगाव जिल्हा मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ॲड. नागेश सातेरी, कार्याध्यक्ष गुणवंत पाटील, प्रा. आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, शिवाजी शिंदे, मधु पाटील, लक्ष्मण होनगेकर, गौडाडकर, ॲड. सुधीर चव्हाण, मनीषा नाडगौडा आदी उपस्थित होते.