कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच आता नव्या मार्गदर्शक सूचीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना न्यायालयात प्रवेश बंदी करण्यात आली असून आजपासून फक्त वकिलांनाच न्यायालयात प्रवेश दिला जात आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. न्यायालयाच्या ठिकाणी जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. आपल्या दाव्यांचे कामकाज, खटल्यांच्या तारखा आदींसाठी येणाऱ्या या लोकांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे लक्षात घेऊन नव्या मार्गदर्शक सूचीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून न्यायालयात फक्त वकील मंडळींना त्यांच्या कामकाजासाठी प्रवेश दिला जात आहे. वकीलासह तातडीच्या प्रकरणातील साक्षीदार, त्याचप्रमाणे कस्टडीत असलेले आरोपी वगळता अशील वगैरे अन्य नागरिकांना न्यायालयात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना मार्गदर्शक सूचीच्या नव्या आदेशाची अंमलबजावणी करताना बेळगाव न्यायालय आवाराची मुख्य प्रवेशद्वारे आज बंद ठेवण्यात आली होती. प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस आणि नियुक्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून तपासणी करूनच वकील वगळता इतरांना न्यायालय आवारात प्रवेश दिला जात होता.
सदर कार्यवाहीची पूर्वकल्पना नसल्यामुळे न्यायालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना आज न्यायालयात प्रवेश करता आला नाही. परिणामी न्यायालयात समोरील मुख्य रस्त्यावर बेळगावसह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांची गर्दी झालेली पहावयास मिळत होती.