बेळगाव पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तर मतदारसंघांमधील प्रत्येक वॉर्डमध्ये सेवानिवृत्त हॉल्वमनना पुन्हा तात्पुरते कामावर घेण्याबरोबरच नव्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर रुजू करून घेऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
शहराच्या पाणीपुरवठा संदर्भात बेळगाव महापालिका सभागृहामध्ये आज शुक्रवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या समवेत पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी, एल अँड टी कंपनीचे अधिकारी तसेच उत्तर मतदार संघातील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. गेल्या आठवड्यापासून शहरातील हॉल्वमन संपावर गेल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा कांही प्रमाणात खंडित झाला होता. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे बेळगाव उत्तर मतदार संघातील प्रत्येक वाॅर्डमध्ये निवृत्त झालेल्या हॉल्वमनना पुन्हा तात्पुरते कामावर घेऊन पाणीपुरवठा खंडित होऊ नये याची काळजी घेणे. तसेच नवीन निवडक 50 कर्मचाऱ्यांची भरती करून घेऊन आजपासूनच त्यांना प्रशिक्षण देऊन येत्या दोन दिवसात त्यांची शहरांमध्ये हॉल्वमन म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याप्रमाणे बेळगाव उत्तर मतदार संघामध्ये जितक्या कूपनलिका अर्थात बोरवेल आहे त्यांच्या दुरुस्तीचे काम पुढील 72 तासात पूर्ण करण्यात यावे अशी सूचनाही यावेळी देण्यात आली.
बैठकीत नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांनी आपापल्या वाॅर्डांमधील समस्या मांडल्या. त्या समस्या जाणून घेऊन आमदार ॲड. अनिल बेनके आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आश्वासन दिले, तर कांही समस्या जागेवरच निकालात काढण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी विनंती करण्याबरोबरच आपण सर्वतोपरी प्रयत्न केले तथापि त्यांनी आपला संप सुरूच ठेवला असल्यामुळे आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
शहर पाणीपुरवठ्याशी संबंधित जे 250 कर्मचारी संपावर गेले आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही अद्यापही आहोत. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. परंतु दरम्यानच्या काळात शहरातील सुमारे 5 लाख जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने जनहितार्थ तातडीने पाणीपुरवठा कर्मचारी भरती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्पावधीत शहराचा सर्व भागातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत होईल, असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले. बैठकीस शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनी बेळगावचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांच्यासह संबंधित अन्य अधिकारी सर्व नगरसेवक आणि मतदारसंघातील जाणकार नागरिक उपस्थित होते.