कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समिती वर बंदी घालण्याची दर्पोक्ती करण्यापेक्षा महाजन अहवालानुसार सीमा प्रश्न सोडविण्यात यावा. अशी बाजू सुप्रीम कोर्टात मांडावी. असे थेट आव्हान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कर्नाटक सरकारला दिले आहे.
एकंदर निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात आढावा घेण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची आज बैठक झाली. यावेळी अध्यक्ष दीपक दळवी बोलत होते. यश मिळेपर्यंत झगडत राहायचं हेच आपल तत्व ठरलेला आहे. या अनुषंगाने येत्या 17 जानेवारीला हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे.
हुतात्म्यांना तुमचं रक्त वाया जाऊ देणार नाही. असे आपल्याला सांगायचे आहे. त्यासाठी 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जाईल असे आवाहन त्यांनी केले.
जगपुरुष छत्रपती शिवरायांचा अवमान करून मराठी भाषिकांचा सूड उगवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न कर्नाटकातील काही कन्नड संघटना करत आहेत. याचा सर्व मराठी भाषिक यांच्या वतीने तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. असे दीपक दळवी यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र एकीकरण समिती वर बंदी घालण्याची दर्पोक्ती करण्यापेक्षा हिम्मत असेल तर महाजन अहवाल संदर्भातील भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडून कर्नाटकाने आपले मोठेपण सिद्ध करावे. असे ते म्हणाले. आज बेळगावकर मराठी भाषेत अत्यंत अस्वस्थ आहे.महाराष्ट्राने या संघर्षात आपले सर्व संघर्ष आव्हाने पेलून साथ दिली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांची संघटना असून मराठी भाषिकांची वेदना महाराष्ट्रामोर मांडण्याचे काम करत असते. अशा वेळी महाराष्ट्राने तातडीने उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी. ही बैठक जर प्रवासाच्या कारणामुळे होत नसेल तर अद्यावत यंत्रणांचा वापर करून सुविधा निर्माण करून ही बैठक घेण्यात यावी असे आवाहन केले आहे.
बेळगावात येऊन धुडगूस करणाऱ्या कन्नड संघटनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. अशा प्रकारचा एखादा तरी खटला कन्नड संघटनांवर कर्नाटकाने घालून दाखवावा असे ते यावेळी म्हणाले.चंदगड किंवा कोल्हापूर मध्ये एकदिवसीय अधिवेशन महाराष्ट्राने भरवावे अशी मागणी मध्यवर्ती ने महाराष्ट्र सरकारकडे करावी अशीमागणी जयराम मिरजकर यांनी केली.
जगन्नाथ बिरजे खानापूर यांनी बोलताना मराठी जनतेत दळवी हल्ल्याचे पडसाद उमटले होते . मनपा वरील भगवा ध्वज काढला होता त्यावेळी त्यांनी खुलासा केला नाही.
छत्रपती अवमानाबाबत काहीही बोलले नाहीत. सीमाप्रश्न सुटल्या शिवाय पर्याय नाही असे विचार मांडले.
सुरुवातीला बैठकीत मयत झालेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी बेळगावातील आणि बंगळूरुतील घटनांना कन्नड संघटना जबाबदार कश्या आहेत हे पटवून देण्यासाठी समितीनं आंदोलन घ्यावे अशी मागणी केली.तर खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी अटक झालेल्या युवकांना सोडवण्यासाठी आम्ही दररोज महेश बिर्जे सह वकिलांच्या संपर्कात आहोत. अटक झालेल्या युवकांना ज्यांना मदत ध्यायची आहे त्यानी द्यावी . इतरांनी त्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन केले.
सारा बंदीच्या चळवळी पासून मराठी भाषिक आंदोलन करताहेत. मात्र कर्नाटक सरकारने आकसापोटी दाखल केलेल्या प्रत्येक खटल्यामध्ये मराठी भाषिक निर्दोष झाला आहे .हे वास्तव नाकारता येत नाही. असे माजी महापौर आणि मध्यवर्ती चे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी सांगितले.
राज्यद्रोह खटला या अगोदरही दाखल झाला आहे. आता या साऱ्या प्रकाराला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ठोस भूमिकेची गरज असून तातडीने उच्चाधिकार समितीची बैठक व्हायलाच हवी असे ते म्हणाले. यावेळी अटक करण्यात आलेल्या तरुणांना साथ देण्याचे काम वकिलांच्या माध्यमातून सुरू आहे बाहेरून मदत न घेता आम्हीच मध्यवर्तीच्या माध्यमातून मदत उभी करूया असे किणेकर यांनी स्पष्ट केले.