सालाबादप्रमाणे लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या मोदगे (मोहनगा -दड्डी) येथील श्री भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा येत्या 15 फेब्रुवारी 2022 रोजी होणार असून 19 रोजी पालखी सोहळ्याने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
श्री भावकाई देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भाऊराव विष्णू पाटील आणि सचिव संतराम विठोबा पाटील तसेच विश्वस्त मंडळ आणि पाटील -भावकी यांच्या उपस्थितीत यात्रा उत्सवाच्या नियोजनाबाबतची बैठक नुकतीच पार पडली. मंदिराच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये यात्रेविषयी सविस्तर चर्चा करून कांही निर्णय घेण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील नियम पाळून रूढी परंपरेप्रमाणे यात्रा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे माघी पौर्णिमा मंगळवार दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी श्री लक्ष्मीदेवी यात्रा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बुधवार दि 16 फेब्रुवारी रोजी देव बोलावून आणणे आणि मंदिरात उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना हे कार्यक्रम होतील. गुरुवार दि 17 फेब्रुवारी रोजी शस्त्रइंगळ्या त्यानंतर शुक्रवार दि 18 फेब्रुवारी रोजी भर यात्रा होईल. शेवटी शनिवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी पालखी सोहळ्यानंतर यात्रा समाप्ती करण्याचे बैठकीत ठरले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या निर्णय -सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येतील, असा ठरावही सर्वानुमते संमत करण्यात आला. तसेच अध्यक्ष सचिव आणि सर्व सदस्य श्री पाटील मित्र मंडळ मोदगे मुंबई यांना प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गावी येऊन सर्वांच्या सहभागाने आणि सहकार्याने यात्रा उत्सव संपन्न करण्यासंदर्भात निमंत्रण देण्यात आले.