मागील दोन वर्षात बेळगाव जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या जीवघेण्या प्रादुर्भावावर दृष्टीक्षेप टाकला असता 2021 च्या एप्रिल, मे आणि जून महिन्यात कोरोनाने सर्वाधिक लोकांना आपले शिकार केले. गेल्या मे महिन्यात तर पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने तब्बल 30 हजाराचा टप्पा ओलांडला होता. एकंदर 2020 च्या तुलनेत 2021 च्या मध्यावधीला जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला.
बेळगाव जिल्ह्यात मागील वर्षी 2021 च्या प्रारंभी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांमध्ये अनुक्रमे 175, 213 व 497 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले होते. तुलनात्मक दृष्ट्या 2020 मध्ये या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. पुढे याच वर्षात एप्रिल महिन्यात एकूण 69 रुग्ण आढळून आले होते, आणि ही संख्या वाढत जूनपर्यंत 169 झाली होती. या तुलनेत मागील 2021 साली मध्यावधीला जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला होता.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जिल्ह्यात 5081 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्याच्या पुढच्या महिन्यात मे मध्ये हा आकडा सहापटीपेक्षा जास्त वाढवून तब्बल 33 हजार 390 इतका झाला. याउलट 2020 मध्ये तो अवघा 92 होता. त्यानंतर जूनमध्ये बाधितांच्या संख्येत झपाट्याने घट होऊन ती 9937 इतकी झाली.
पुढे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव निवळत चालल्याची लक्षणे दिसू लागली. कारण जुलैपासून आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने कमी झाली. डिसेंबर 2021 अखेर ती 160 इतकी होती. मात्र 2021 च्या तुलनेत 2020 साली जुलै ते डिसेंबरच्या कालावधीत जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढलेली होती. ऑगस्ट 2021 मध्ये 978 रुग्ण आढळून आले होते तर ऑगस्ट 2020 मध्ये त्यांची संख्या 9007 इतकी जास्त होती.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात दरमहा आढळून आलेल्या कोरोना बाधितांची तुलनात्मक आकडेवारी (अनुक्रमे महिना, रुग्ण संख्या, 2021 वर्ष, 2020 वर्ष यानुसार) पुढील प्रमाणे आहे. जानेवारी : 175 (2021) -0 (2020), फेब्रुवारी : 213 -0, मार्च : 497 -0, एप्रिल : 581 -69, मे : 33390 -92, जून : 9937 -169, जुलै : 2435 -2907, ऑगस्ट : 978 -9007, सप्टेंबर : 521 -7213, ऑक्टोबर : 137 -5220, नोव्हेंबर : 86 -976, डिसेंबर : 160 (2021) -876 (2020).