राज्यातील कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरीएंट संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तज्ञांची उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.
आम्ही कोरोना आणि ओमिक्रॉन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यांचा संसर्ग देशासह कर्नाटक आणि आसपासच्या राज्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यासंदर्भात तज्ञांशी चर्चा करणे गरजेचे असल्याने मी तज्ञांची बैठक बोलावून विचारविनिमय करणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी काल सोमवारी स्पष्ट केले.
जर संसर्गाचा वेग अतिउच्च असेल तर तज्ञांचा सल्ला आणि शिफारशीनुसार परिस्थिती हाताळली जाईल. तज्ञांशी चर्चा करून त्यांचे मत अजमावल्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन योग्य तो अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान संसर्ग रोखण्यासाठी सरकारने यापूर्वीच गेल्या 28 डिसेंबरपासून येत्या 7 जानेवारी रोजी सकाळपर्यंत दररोज रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू अर्थात रात्रीची संचारबंदी जारी केली आहे.