संकेश्वर येथे अलीकडेच एका महिलेची पिस्तुलीने गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी संकेश्वर पोलिसांनी संकेश्वर नगरपालिकेचे भाजप सदस्य उमेश कांबळे यांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.
संकेश्वर येथील संसुद्दी गल्ली क्रॉस येथे घरी एकट्या राहणाऱ्या शैलजा उर्फ गौरव्वा सुभेदार या महिलेचा गेल्या रविवारी 16 जानेवारी रोजी पिस्तूलने गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या खळबळजनक खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश भायगोळ आणि संकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक कार्यरत झाले होते. पोलीस तपासात खुनाचा हा प्रकार पैशाच्या व्यवहारातून झाल्याचे उघडकीस आले आहे.
शैलजा सुभेदार आणि संकेश्वर नगरपालिकेचे सदस्य उमेश कांबळे यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार होता. या व्यवहारातून उभयतांमध्ये वारंवार खटकेही उडत असल्यामुळे मनस्ताप झालेल्या कांबळे यांनी शैलजा यांच्या घरी जाऊन गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याचे कळते.
घटनास्थळी खुनासाठी वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि अन्य काही पुरावे पोलिस तपास पथकाने ताब्यात घेतले आहेत. या पद्धतीने संकेश्वर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात खुनाच्या घटनेचा छडा लावण्यात यश मिळविले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या उमेश कांबळे यांना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे समजते.