हलशी (ता. खानापूर) ग्रामपंचायती समोरील लाल -पिवळा झेंडा जाळण्याबरोबरच भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवून राजद्रोहासह विविध गुन्हे दाखल करून कारागृहात डांबलेल्या तिघा युवकांचा जामीन बेळगावच्या 8 व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त मंजूर केला आहे.
गणेश कृष्णाजी पेडणेकर, सचिन ओमान्ना गुरव आणि संजू उर्फ संजीव ओमान्ना गुरव अशी जामीन अर्ज मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत. खानापूर तालुक्यातील हलशी ग्रामपंचायती समोरील लाल -पिवळा झेंडा जाळणे. तसेच कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणे हे आरोप या तिघांवर ठेवून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
गुन्हा क्र. 158 /2021 मध्ये हलशी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी रामप्पा जयप्पा राडेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरुद्ध नंदगड पोलीस स्थानकात भादवि कलम 153/अ, 295, 124/अ (राजद्रोह), 102 ब अन्वये गुन्ह्यांसह सेक्शन 4 केपीडीपी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भातील याचिकेवर आज शुक्रवारी बेळगावच्या आठव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होऊन न्यायालयाने तीनही संशयितांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 1 -1 लाखाच्या दोन जामीनांसह तितक्याच रकमेचे हमीपत्र, याचिकादारांनी प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहणे, तपास सुरू असताना तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, साक्षीदारांना धमकावून नये आणि भविष्यात पुन्हा असा गुन्हा करून नये या अटींवर गणेश पेडणेकर, सचिन गुरव आणि संजीव गुरव यांचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे.
आता उद्या जामीनाची प्रक्रिया रितसर पूर्ण केली जाईल. त्यामुळे बहुदा उद्या सायंकाळपर्यंत तिघेही कारागृहातून बाहेर येतील, असे याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. महेश बिर्जे यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले आरोपींच्यावतीने ॲड. बिर्जे यांच्यासह ॲड. एम. बी. बोंद्रे काम पाहत आहे.